
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे. आता या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचं आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती.
या राज्यातल्या मराठा समाजाला माझं सांगणं आहे की, जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. ओबीसीचे नेते, हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. आज माझ्यावर वेळ आली आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची हे नको. कोणाचं तरी ऐकून एखाद्याच्या जीवावर उठायचं. करणाऱ्या पेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे. आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावरही बितू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्या. आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील असल्याचेही त्यांना सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis