
नाशिक, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) । नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून सुदाम मंगळू जुंद्रे (वय ३५, रा. मळे वस्ती, लोहशिंगवे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे पाच वाजता नारायण दत्तू जुंद्रे यांच्या घराजवळ सुदाम जुंद्रे मयत अवस्थेत आढळले. परिसरातील मंगेश पिराजी पाटोळे हा दररोजप्रमाणे पहाटे तीन वाजता भाजीपाला विक्रीसाठी जात असताना या रस्त्यावरून गेला होता. मात्र, परत येताना सुदाम जुंद्रे रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या पोट, गळा व मान या भागांवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याचे स्पष्ट झाले.
सुदाम जुंद्रे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. घटनेनंतर पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.
ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या लोहशिंगवे परिसरात आठवड्यातून दोन वेळा बिबट्याचे हल्ले होत आहेत. सध्या १५ ते २० बिबट्यांचा वावर आहे. आम्ही दुग्ध व्यवसाय सोडून इतर काही साधनही नाही. शहरात हल्ला झाला तर सर्व यंत्रणा जागी होते, पण खेड्यांतील लोकांच्या जीवाला काही किंमत नाही का? वडनेरला लहान मुलांवर हल्ला झाला तेव्हा संपूर्ण प्रशासन सक्रिय झाले, मग आमच्यासाठी वेगळा न्याय का?”
ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत या प्रश्नावर ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत आम्ही सुदामच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. शासनाने आता तरी लक्ष घालून या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा.”
दरम्यान, सलग होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे वनविभाग सध्या ग्रामस्थांच्या तीव्र रोषाचा केंद्रबिंदू बनला आहे. ग्रामीण भागात जनावरांबरोबरच माणसांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV