
अकोला, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या जमिनीचे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. या व्यवहारात केवळ १ टक्का वाटा असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र ९९ टक्के वाटा असलेल्या पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, यामुळे प्रशासनावर दुहेरी निकष लावल्याचा आरोप होत आहे.या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ‘या प्रश्नाचं उत्तर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील’ असे म्हणत जबाबदारी झटकली. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी शितल तेजवानी आपल्या पतीसह विदेशात फरार झाल्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी ‘हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनीच शोधून आणावे’ असे वक्तव्य केले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवार यांचे हे उत्तर पार्थ पवारांवरील आरोपांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे