
नागपूर, 8 नोव्हेंबर, (हिं.स.)। आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्र, भारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजली, कारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
संस्कार भारतीच्या अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, झाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथ, विदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असताना, तंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवी, अभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर