
नाशिक, 10 डिसेंबर (हिं.स.)।अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या ६० व्या हीरक महोत्सवी अधिवेशनाच्या तयारीस गती मिळावी, या उद्देशाने नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या प्रांत अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह प्रमोदराव कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी ४ वाजता संपन्न झाले. यावेळी अभाविप पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटनमंत्री गितेश चव्हाण, प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, उद्योजक प्रा. जयंत भातांबरेकर, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रतिमापूजन व समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमोदराव कुलकर्णी यांनी अधिवेशन स्वागत समितीच्या अध्यक्षपदी प्रा. जयंत भातांबरेकर, तर सचिवपदी सागर वैद्य यांच्या नावाची घोषणा केली. प्रांत अधिवेशनाच्या सर्वांगीण नियोजनाचे केंद्रबिंदू म्हणून या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील. कार्यक्रम नियोजन, संचलन व व्यवस्था, समित्यांमधील समन्वय, प्रचार-प्रसार, मीडिया समन्वय आणि कार्यकर्ता संपर्काचे संचलन या कार्यालयातून होणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ तर आभार प्रदर्शन अभाविप नाशिक महानगरमंत्री व्यंकटेश अवसरकर यांनी केले.
२३ व्यवस्थ्या समित्यांमध्ये २२१ कार्यकर्ते
अधिवेशनातील विषयक समित्यांची रूपरेषा, प्रतिनिधी नोंदणी, पाहुण्यांचे वेळापत्रक, उपक्रमांची आखणी आणि ठरावांची प्राथमिक तयारी कार्यालयातून राबवली जाणार आहे. त्यासाठी २३ व्यवस्था समित्यांची स्थापना करण्यात आली असून २२१ कार्यकर्ते कार्यरत असतील.
विविध विषयांवर सखोल चर्चा
नाशिकमध्ये होणार्या अभाविपच्या प्रांत अधिवेशनाला एक हजार विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अधिवेशन काळात विद्यार्थी प्रश्न, शिक्षणातील सुसंस्कारित मूल्ये, युवकांच्या प्रगतीची दिशा आणि संघटनात्मक कार्य या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
- गितेश चव्हाण, क्षेत्रीय संघटनमंत्री, पश्चिम क्षेत्र, अभाविप
अधिक वेग व दिशा मिळेल
अधिवेशनात सहभागी होणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक उत्तम अनुभव मिळेल. तसेच नाशिक शहरात कार्यालय कार्यान्वित झाल्यामुळे अधिवेशनाच्या तयारीला अधिक वेग व दिशा मिळण्यास मदत होईल.
- प्रमोदराव कुलकर्णी, विभाग कार्यवाह, रा. स्व. संघ
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV