
अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)।
शेगाव येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
: शेख जाफर शेख बब्बू कुरेशी (रा. नायगावं अकोटफैल, अकोला) याने दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेगाव येथील मुस्लिम कब्रस्थान येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी : ११ नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी शेख साबिर शेख बब्बू कुरेशी (मृतकाचा भाऊ) यांनी शेंगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यामध्ये मृतक शेख जाफर याने अंदाजे एक वर्षापूर्वी त्याचा साला मोहसीन अनिस कुरेशी आणि चुलत साला राईस शकील कुरेशी (दोघे रा. संजय नगर, नायगाव, अकोला) यांच्यासोबत १६ शौ प्लॉट, अकोटफैल येथे भागीदारीत दूध डेअरी उघडली होती. या व्यवसायातून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. आरोपी मोहसीन, शकील व रईस यांनी ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मृतकाकडून दूध डेअरीच्या चाव्या हिसकावून घेतल्या आणि त्याला मारहाण केली. मृतकाने गुंतवलेले अडीच लाख रुपये परत न मिळाल्याने आणि झालेल्या छळाला कंटाळून ८ नोव्हेंबर रोजी तो घरातून निघून गेला आणि ९ नोव्हेंबर रोजी त्याने आत्महत्या केली. मृतकाच्या खिशात एक चिट्ठी आढळली होती. फिर्यादीच्या आरोपावरून शेंगाव पोलिसांनी बी.एन.एस. (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत कलम १०८ (३)(५) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने आरोपी शेख मोहसीन याने ऍड. नजीब शेख यांच्यामार्फत खामगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर खामगाव सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. बी. जाधव यांनी आरोपी मोहसीन कुरेशी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे