
येवला, 10 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने राज्यातील सर्व बँक मित्रांच्या विविध तातडीच्या प्रश्नांवर १२ डिसेंबर २०२५ रोजी मोर्चाचे आयोजन यशवंत स्टेडियम सीताबडीं नागपूर ते विधान भवन नागपूर येथे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील अनेक बँक मित्र तसेच सिन्नर, चांदवड,इगतपुरी, मनमाड, लासलगाव, विचुंर, तसेच नाशिक शहरातील असंख्य बँक मित्र यावेळी नागपूरसाठी कुछ करणार असल्याची माहिती संबंधित समन्वयकांनी दिले आहे. या मोर्चात राज्यभरातील एक हजार बँक मित्र सहभागी होत आहेत. भारत सरकार व रिझर्व्ह बँक यांच्या पुढाकाराने देशातील प्रत्येक नागरिकाला औपचारिक बैंकिंग सेवांशी जोडण्यासाठी आर्थिक समावेशकतेचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री जन धन योजनेने या उपक्रमाला अभूतपूर्व गती दिली. देशभरातील ५७ कोटींहून अधिक खाती आणि २.७४ लाख कोटी रुपयांची बचत औपचारिक बँकिंग प्रणालीत आणण्यात आली असून त्यापैकी ३.६४ कोटी खाती महाराष्ट्रात उघडण्यात आली आहेत. ज्यांची एकत्रित बचत १८,०१० कोटी रुपये आहे. या खात्यांपैकी ९०% खाती आधार संलग्न असून २.५६ कोटी रुपे कार्ड वितरित करण्यात आले आहेत. १.६४ कोटी लाभार्थीना जीवन ज्योती विमा तर ३.३१ कोटींना आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. तसेच ५५.३० लाख नागरिकांना अटल पेन्शन योजनाअंतर्गत सुरक्षितता प्राप्त झाली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व अनुदान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, किसान कल्याण योजना इत्यार्दीचे वितरण ह्याच खात्यांतून होते. कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळात, जीवाची पर्वा न करता बँक मित्रांनी अखंडपणे सेवा देत सरकारच्या योजनांची अंमलबजावणी सुरळीतपणे केली. आज राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून वीस हजारांहून अधिक बँक मित्र ग्रामीण भाग, वाडी-वस्ती, दुर्गम पाडे अशा सर्व ठिकाणी जनतेसाठी बँकिंगची दारे उघडी ठेवून कार्यरत आहेत. लाडकी बहिण योजना तसेच इतर अनेक महत्त्वाच्या योजनांची अल्पावधीत प्रभावी अंमलबजावणी बँक मित्रांशिवाय शक्यच नव्हती. दुर्दैवाने मागील काही वर्षांत बँक मित्रांच्या सेवेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रारंभी बँकेमार्फत थेट कंत्राटी नियुक्ती केली जात होती. मात्र आता मध्यस्थ कंपन्यांमार्फत कंत्राटी नियुक्ती दिली जाते. सेवेत कोणतीही सुरक्षा नाही, निश्चित सेवा अटी नाहीत. किमान वेतन, रजा, वैद्यकीय सुविधा, प्रविडेंट फंड यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मिळणारे कमिशन अत्यंत कमी असून, अनेक ठिकाणी कामाची उपलब्धता कमी असताना अनावश्यकपणे अधिक बँक मित्र नेमले जात असल्याने उत्पन्न आणखी घटले आहे. वाढत्या कुटुंब जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणी तीव्र झाल्या आहेत व काही सहकाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचीही दुःखद परिस्थिती निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV