
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)।
सन 2024-25 मधे ध्वजदिन निधी संकलनामधे राज्यात बीड प्रथम आल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे हस्ते बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला
माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजना व उपक्रम राबविण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबर हा 'ध्वजदिन' म्हणून पाळण्यात येतो. यानुसार ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात येते.
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणारे शूरवीर, सेवेत अपंगत्व प्राप्त झालेले जवान तसेच सशस्त्र दलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. याशिवाय सैनिकी मुलांच्या वसतिगृहांचे संचालन व इतर कल्याणकारी उपक्रमांसाठीही हा निधी महत्त्वपूर्ण ठरतो.
दरवर्षी शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याला ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट दिले जाते. ध्वजनिधी-2024 (संकलन वर्ष 2024-25) या वर्षासाठी बीड जिल्ह्याला रुपये 39,50,000/- (एकोणचाळीस लाख पन्नास हजार) इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी व अध्यक्ष, ध्वजदिन निधी संकलन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना सक्रीय सहभागाचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बीड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मे 2025 पर्यंत 100% उद्दिष्ट पूर्ण केले तसेच 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एकूण रुपये 1,32,30,000/- (एक कोटी बत्तीस लाख तीस हजार) इतका निधी गोळा करून 335% संकलनासह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या भव्य संकलनात जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महसूल प्रशासन, शासकीय रुग्णालये, तसेच राज्य परिवहन महामंडळ यांनी केलेले योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील सर्वोच्च संकलनाबद्दल आचार्य देवव्रत, राज्यपाल महाराष्ट्र व गुजरात यांच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील लोकभवन येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन करीत मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्वांचे कौतुक केले. ध्वजदिन निधी संकलनाची जबाबदारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पार पाडते.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (नि.) यांनीही बीड जिल्ह्यातील जनतेचे व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानत, पुढील वर्षीही याच उत्साहाने अधिक मोठे योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis