
- तेलंगणामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार- दुग्ध प्रक्रिया कारखान्यासाठी 150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी गोदरेज जर्सीचा सामंजस्य करार
हैदराबाद, 10 डिसेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात वैविध्यपूर्ण कृषी व्यवसायांपैकी एक गोदरेज अॅग्रोव्हेटची उपकंपनी असलेल्या क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेडने तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिट 2025च्या निमित्ताने तेलंगणा सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. 40 एकर जागेवर अत्याधुनिक दुग्ध प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी कंपनी 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या नवीन गुंतवणुकीसह, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या राज्यातील विविध व्यवसायांमधील एकूण गुंतवणूक आता 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
दिवसभरात किती प्रोटीन्स अथवा प्रथिने खावीत, याचे काही ठरलेले प्रमाण आहे. मात्र, जवळजवळ 73 टक्के भारतीय यापेक्षा कमी प्रथिने खातात. दूध, दही, पनीर असे दुग्धजन्य पदार्थ आणि दुधापासून बनवलेली पेये - हा प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत आहे. या गुंतवणुकीमुळे गोदरेज जर्सी केवळ राज्यातील दुग्ध परिसंस्थेला बळकटी देणार नाही तर ग्राहकांच्या वाढत्या पोषण आणि प्रथिनांच्या गरजांनुसार उत्पादने देखील उपलब्ध करून देईल.
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी , आयएएस संजय कुमार , सरकारी उद्योग आणि वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाचे तेलंगणा सरकारचे विशेष मुख्य सचिव; पिरोजशा गोदरेज, कार्यकारी उपाध्यक्ष – गोदरेज उद्योग समूह; आनंद रामास्वामी, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, गोदरेज जर्सी आणि राकेश स्वामी, ग्रुप प्रेसिडेंट - कॉर्पोरेट अफेअर्स, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप, यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या सामंजस्य करारावर भाष्य करताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी म्हणाले, “सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी गुंतवणूकदार-अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी तेलंगणा कटिबद्ध आहे. गोदरेज उद्योग समूहासोबतची आमची भागीदारी याचाच पुरावा आहे. कृषी-अन्न प्रक्रिया क्षमता मजबूत करण्यापासून, या उद्योगांचा विस्तार करण्यापर्यंत आमच्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक रोजगार वाढेल. यासोबतच तेलंगणा हे भारतातील व्यवसायासाठी गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण ठरते आहे.”
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कार्यकारी उपाध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाल्या, तेलंगणा राज्यात आम्ही भक्कम स्थितीत आहोत. त्यामुळेच औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि सार्वजनिक-खासगी सहकार्यात्मक दृष्टिकोनातून प्रभावी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी हा सामंजस्य करार सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. दीर्घकालीन आणि शाश्वत तेल पाम वृक्ष लागवडीला चालना देण्यापासून ते शहरी गृहनिर्माण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यापर्यंत आणि आमच्या दुग्धशाळेच्या यंत्रणेचा विस्तार करण्यापर्यंत तसेच डिजिटल-प्रथम उपायांद्वारे एमएसएमई वाढ सक्षम करण्यापर्यंत, तेलंगणा सरकारसोबतची आमची ही भागीदारी सर्वसमावेशक, नावीन्यपूर्ण आणि लवचिक भविष्य घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
2023 मध्ये, गोदरेज अॅग्रोव्हेटने राज्यातील खम्मम जिल्ह्यात एकात्मिक ऑइल पाम कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. अत्याधुनिक क्रूड पाम ऑइल मिल आणि पुढील वर्षी सुरू होणाऱ्या अपस्ट्रीम संशोधन आणि विकास केंद्रासह, या कॉम्प्लेक्समध्ये नजीकच्या भविष्यात रिफायनरी स्थापन करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय, दर्जेदार पायाभूत सुविधा, शाळा आणि अन्य सुविधांमुळे राज्यातील काही भागांना घरे घेणाऱ्यांची चांगलीच मागणी आहे. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीजने या वर्षाच्या सुरुवातीला हैदराबादच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली. नागरिकांना प्रीमियम निवासी ऑफर प्रदान करण्याच्या योजनेसह, गोदरेज प्रॉपर्टीज चार प्रकल्पांमध्ये 10,000 कोटी रुपये गुंतवेल.
गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि एमडी सुनील कटारिया म्हणाले, “तेलंगणासह भारतात पोषक दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांची मागणी चांगलीच वाढली आहे. शहरी जीवनशैलीचे परिणाम, आरोग्याप्रती वाढती जागरूकता आणि ग्राहकांची पौष्टिक अन्नाची गरज भागवणारा प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून या दुग्धजन्य पदार्थांना चांगलेच महत्त्व आहे. दुग्धव्यवसाय हा प्रथिनांच्या सर्वात नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे आणि जवळजवळ तीन दशकांच्या आमच्या कौशल्यामुळे, गोदरेज जर्सी या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास वचनबद्ध आहे. तेलंगणा सरकारसोबतचा आमचा सामंजस्य करार हा अशा सुविधा उभारण्याच्या दिशेने एक पाऊल आहे जो राज्याच्या पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे आणि नावीन्यपूर्ण प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ तयार करेल. आणि त्याचबरोबर राज्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होईल.” या प्रकल्पामुळे तीन वर्षांच्या कालावधीत 300 हून अधिक रोजगाराच्या थेट संधी निर्माण होतील असा अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule