
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा तसेच दिव्यांगांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा समारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील विशेष शाळा/कार्यशाळेमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले होते. प्रावीण्यप्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी देण्यात आली.
दिव्यांगांसाठी चॅटबॉटवरील सोयी-सुविधा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 चा कायदा, दिव्यांगत्व जन्माला येऊ नये यावर उपयोजना, शासकीय योजना, दिव्यांग वित्तीय महामंडळाच्या योजना व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याबाबत माहितीपर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमात मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, सर्व कर्मचारी, जिल्हा परिषदेमधील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. विशेष शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, तालुकास्तरावरील विशेष शिक्षक, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील इतर दिव्यांग व्यक्तीही यावेळी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी