दीपावलीला युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने भारतीय संस्कृती जगभर पसरण्यास हातभार ! - आशिष शेलार
नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार करण्यात हातभार लागेल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी सभा
दीपावलीला युनेस्कोचा दर्जा मिळाल्याने भारतीय संस्कृती जगभर पसरण्यास हातभार ! - आशिष शेलार


नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार करण्यात हातभार लागेल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी सभागृहात केले.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भुरचनेचे यूनेस्कोचे मानांकन आपण या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली आपण मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच मूर्त स्वरूपाचा आहे.

आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे. या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे. निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात. यामुळे भारतीय सण, परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे.

आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे नमूद करीत मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या माध्यामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande