
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। आईचे प्रेम आणि त्याग यांचे जिवंत उदाहरण पनवेल परिसरात पाहायला मिळाले आहे. मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला त्याच्या आईने स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले. नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हे मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले असून सध्या आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
महाड तालुक्यातील बिरवाडी येथील सूरज पवार यांना २०२४ साली गंभीर किडनी विकाराचा त्रास सुरू झाला. तपासणीत त्यांना ‘अॅटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम’ (Atypical HUS) हा दुर्मिळ आजार असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच त्यांना आधीपासूनच IG-A नेफ्रोपॅथीचा त्रास होता. सुरुवातीला औषधोपचार सुरू ठेवण्यात आले, मात्र कालांतराने दोन्ही मूत्रपिंड निकामी होण्याच्या मार्गावर आल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला.
आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी आईने कोणताही विचार न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने यशस्वीपणे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली.
या संदर्भात बोलताना डॉ. अमर कुलकर्णी म्हणाले, “आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण देखरेखीमुळे रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले. प्रत्यारोपणानंतर सूरज पूर्णपणे सावरला असून तो पुन्हा दैनंदिन जीवनात सक्रिय झाला आहे. आईची प्रकृतीही पूर्णपणे ठणठणीत आहे.” ही घटना आई-मुलाच्या नात्याचे जिवंत उदाहरण ठरत असून समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके