
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठा बोगस मतदारांचा घोळ झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे. पनवेल मनपाच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल १२,१४३ दुबार व संशयित मतदारांची नावे असल्याचा दावा करत त्यांनी थेट महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे.
घरत यांनी सांगितले की, ही संशयित नावे नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक मतदारच ग्राह्य धरले जातात. मात्र, जिल्ह्याबाहेरील मतदारांची नावे पनवेल मनपाच्या यादीत आढळल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी शिरीष घरत यांनी पनवेल मनपा आयुक्त व मतदार यादीचे प्राधिकृत अधिकाऱ्यांना तातडीचे निवेदन दिले आहे. त्यात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ६,१३८ आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ६,००५ अशी एकूण १२,१४३ दुबार किंवा संशयित नावे आढळल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार विधानसभा निवडणूक मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाते. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी झाल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीही विधानसभा निवडणुकीदरम्यान दुबार नावे आढळूनही ठोस कारवाई न झाल्याने, यावेळीही बोगस मतदारांमुळे निकाल प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घरत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नावांची कठोर छाननी करावी, अंतिम मतदार यादीत विशेष चिन्हांकन करावे आणि प्रत्येक मतदाराचे मतदान एकाच केंद्रावर व्हावे, अशी मागणी केली आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके