
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल यांच्या वतीने नव्याने सजविण्यात आलेल्या मराठा भवन कार्यालयाचे उद्घाटन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यानिमित्त “मराठा कृतज्ञता मेळावा” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्यात मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या सेवेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, स्वयंसेवक तसेच कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
मार्गदर्शन करताना मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने एकदिलाने संघटित राहावे, असे आवाहन केले. “न्यायासाठीचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहणार आहे. आपण आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने, परंतु ठामपणे लढत राहिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक एकजूट हीच मराठा समाजाची खरी ताकद असून समाजातील तरुणांनी आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सदानंद शिर्के, जिल्हा समन्वयक विनोद साबळे, गणेश कडू, रामदास शेवाळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके