
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : मानवी हक्क आयोग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क साजरा करण्यात आला.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. कारागृह व सुधारसेवा पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या प्रेरणेने विशेष कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बंदी बांधवांची विविध हक्क व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष विनोद जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी कारागृहातील बंदिस्त महिला तसेच पुरुष बंदी बांधवांना मानवी हक्कांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष कारागृहाचे प्रभारी अधीक्षक सचिन पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच रत्नागिरी विशेष कारागृहातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी