नागपूरमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ
हिवाळी अधिवेशनात ‘मानव–बिबट संघर्षा’वर राज्यभरात तुफान चर्चा नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हालचाली दिसत असल्य
नागपूरमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ


हिवाळी अधिवेशनात ‘मानव–बिबट संघर्षा’वर राज्यभरात तुफान चर्चा

नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हालचाली दिसत असल्याची माहिती मिळत असतानाच बुधवारी शिवनगर परिसरातील एका घरात बिबट शिरून सात जणांना जखमी केल्याने खळबळ उडाली.

गेल्या 19 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील घरात शिरलेल्या बिबट्याला दोन तासांच्या थरारानंतर पकडण्यात आले होते. त्यानंतर 8 डिसेंबरला पारडीजवळील ओसाड भागात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. मात्र वनविभागाची आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची टीम पोहोचेपर्यंत तो पसार झाला होता.दरम्यान, मंगळवारी विधानसभेत राज्यातील वाढत्या मानव–बिबट संघर्षावर चर्चा झाली. योगायोगाने याच पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “बिबट्यांना जंगलात पुरेसे भक्ष्य मिळावे म्हणून 1 कोटी रुपयांच्या शेळ्या उपलब्ध करून देणार” अशी घोषणा केली.

बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी

शिवनगरमधील एका घरात बुधवारी सकाळी बिबट घुसला आणि त्याने सलग हल्ले चढवून सात जणांना जखमी केले. जखमींमध्ये लल्लेश्वरी शहू, चंदन शहू, कुंभकर्ण निशाद, रमेश साहित्य, खुशी शहू, कुवरसरम देखवाड आणि भारती शहू यांचा समावेश आहे. यापैकी कुंभकर्ण निशाद यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व जखमींवर पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. “बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्तीप्रमाणे गांभीर्याने घेऊन तातडीची कारवाई केली जाईल,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

बिबट्याची 15 फूट उंच उडी

नागपूर वन विभाग आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची टीम घटनास्थळी दाखल झाल्यावर बचाव कार्य सुरू झाले. बिबट्या मोकळ्या जागेत असल्याने हे ऑपरेशन आव्हानात्मक ठरले. पहिला डार्ट लक्षवेधी ठरण्यात अयशस्वी झाला, तर दुसरा डार्ट लागल्यानंतरही बिबट ताबडतोब बेशुद्ध झाला नाही. अर्ध-बेशुद्ध अवस्थेतही बिबट्याने 15 फूट उंच उडी मारत घराच्या टेरेसच्या कठड्याला बराच वेळ धरून ठेवले. अखेर इंजेक्शनचा परिणाम चढल्यानंतर तो खाली पडला आणि बचाव पथकाने सुटकेचा श्वास घेत त्याला जाळीत पकडून पिंजऱ्यात ठेवले. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कार्यात अडथळे निर्माण झाले होते.

विधानसभेत आमदारांचा अनोखा निषेध

विधानसभेत विधेयकांवर चर्चा सुरू असतानाच जुन्नरचे आमदार शरद सोनावणे हे बिबट्याच्या कातडीसारखा ड्रेस परिधान करून सभागृहात दाखल झाले. त्यांच्या या अनोख्या अवतारामुळे सभागृहात एकच हशा पिकला. तालिका सभापतींनी त्यांना तत्काळ बाहेर जाण्याचे निर्देश दिले.सत्ताधारी बाकावरून “बिबट्या चार पायांचा असतो” अशी टीका करण्यात आली. जुन्नरमध्ये गेल्या काही वर्षांत बिबट हल्ल्यांत 55 नागरिकांचा बळी गेला आहे. या वाढत्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठीच आपण असा पोशाख परिधान केला असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande