हिंदूविरोधी शक्तींना बोलण्याने नव्हे तर कृतीतून धडा शिकवू – मंत्री नितेश राणे
परभणी, 10 डिसेंबर, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथे दिवाळीच्या दिवशी झालेल्या गटांच्या हाणामारीप्रकरणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. हिंदू बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या
हिंदूविरोधी शक्तींना बोलण्याने नव्हे तर कृतीतून धडा शिकवू – मंत्री नितेश राणे


परभणी, 10 डिसेंबर, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथे दिवाळीच्या दिवशी झालेल्या गटांच्या हाणामारीप्रकरणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. हिंदू बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांना सरकार गप्प बसणार नसून “हिंदूविरोधी शक्तींना नुसत्या शब्दांनी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून धडा शिकवणार,” असे कठोर इशाराही त्यांनी यावेळी दिला.

२१ ऑक्टोबर रोजी फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूंच्या एकूण २० जणांवर बोरी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. या घटनेत मारोती निवृत्ती डुकरे (वय ४३) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान ६ नोव्हेंबर रोजी नांदेड येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थ व नातेवाईकांनी मयताचे पार्थिव बोरी पोलिस ठाण्यात आणून न्याय मागणीसाठी आंदोलन केले होते.

या वेळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील व बोरीचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

यावेळी ग्रामस्थांनी घटनेची चौकशी एसआयटीमार्फत करावी, आरोपींची मालमत्ता जप्त करून मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेशी संबंध नसलेल्या हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

हिवाळी अधिवेशनातून खास वेळ काढून मृतकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगत, राणे यांनी सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

कुटुंबाला अद्याप मदत नाही; ग्रामस्थांचा रोष कायम

घटनेला एक महिना उलटूनही मृतक डुकरे यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मागण्यांसाठी संबंधित कुटुंबीयांचे परभणी येथे उपोषण सुरू आहे.

पिंपरी रोहिला परिसरात अद्याप तणाव कायम असला, तरी मंत्री राणे यांच्या भेटीमुळे प्रकरणाच्या निपटाऱ्यास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande