तालिका सभापती निवडीमुळे आ. डॉ. राहुल पाटलांचे परभणीचे प्रतिनिधित्व अधिक बळकट
परभणी, 10 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार डॉ. राहुल पाटील यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अध
तालिका सभापती म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील यांची नियुक्ती


परभणी, 10 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार डॉ. राहुल पाटील यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

डॉ. पाटील हे सलग तिसऱ्यांदा परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत. विविध विषयांवर त्यांच्या सखोल अध्ययनासह प्रभावी मांडणीमुळे त्यांनी सभागृहाचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातील प्रश्नांवर ते सातत्याने माहितीपूर्ण आणि ठोस भूमिका मांडत असल्याने त्यांना हा मान मिळाल्याचे मानले जात आहे. परभणी विधानसभेला प्रथमच तालिका सभापतीपदाचा बहुमान मिळाल्याने जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज विनाअडथळा सुरळीत पार पडावे, यासाठी ज्येष्ठ सदस्यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती केली जाते. हे सभागृहातील महत्त्वाचे पीठासीन अधिकारी असतात. विधिमंडळाचे नियम, प्रक्रिया आणि कामकाजाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. कामकाजाचा क्रम ठरविणे, सदस्यांना संधी देणे आणि सभागृहातील शिस्त राखणे ही त्यांच्या भूमिकेतील महत्त्वाची कामे आहेत.

डॉ. राहुल पाटील यांच्या नियुक्तीमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार असल्याचे स्थानिक स्तरावर गौरवले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande