
नाशिक, 10 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक असा समृद्ध वारसा लाभला आहे. या जिल्ह्यात बारा जोर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरसह विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन ठिकाणे आहेत. या ठिकाणांची नाशिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देत नाशिकचे ब्रॅण्डिग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक फेस्टिव्हलबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे, पर्यटन विभागाचे उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. नंदकुमार राऊत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक रवि साखरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, नाशिकमध्ये धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, पर्यटक ठिकाणे आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचली पाहिजे. नाशिकची सर्वांगीण माहिती या फेस्टिव्हलमध्ये समाविष्ट असावी. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून नाशिकची ओळख निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा मान्यतेसाठी सादर करावा. तो मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. राऊत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. झगडे यांनी आपापल्या विभागांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV