
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। गेल्या आठवडाभरात सातत्याने विमानांचे रद्द होणारे उड्डाण आणि विलंबामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळू लागला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण रद्द होणारी आणि उशिराने उड्डाण करणारी विमानांची संख्या घटली आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात सुधारणा झाली असून विमानतळाची एकूण कार्यक्षमताही वाढताना दिसत आहे.‘इंडिगो’ने वैमानिकांच्या एफडीटीएल या नव्या सुधारणांच्या बाबतीत दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे केवळ पुण्यातीलच नाहीतर देशातील लाखो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. १ ते ९ डिसेंबर दरम्यान पुणे विमानतळावरून इंडिगोच्या विमानांची होणारी उड्डाणे मोठ्या प्रमाणात रद्द झाली.या काळात तब्बल २०८ विमानांची उड्डाणे रद्द झाली तर १०१ विमानांना मोठा उशीर झाला. या कालावधीतील सुरुवातीला उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक होते. चार डिसेंबरला ९६ उड्डाणांपैकी ३५ उड्डाणे रद्द झाली होती, तर पाच डिसेंबरला हा आकडा तब्बल ५३ वर गेला होता. उशीर होणाऱ्या उड्डाणांची संख्या देखील त्या दोन दिवसांत वाढून सहा डिसेंबरला २६ आणि ३० पर्यंत पोहोचली होती.उड्डाणातील ही अनियमितता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. नियंत्रण कक्षातील वाढलेला समन्वय, वाहतूक मार्गांचे पुनर्नियोजन आणि विमानकंपन्यांशी तातडीचे संवाद या उपायांमुळे उड्डाणांचा वेळापत्रक सुधारलेले आहे. उड्डाणाबाबत प्रवाशांच्या तक्रारीतही घट झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु