
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर व २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रांचा संदर्भ देत महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदारयादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, याबाबतचे आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार नवीन तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या या सुधारित तारखांनुसार सर्व महानगरपालिकांनी संबंधित प्रक्रिया तातडीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले असून महानगरपालिका निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यापूर्वी मतदारयादी प्रसिद्धीची तारीख १० डिसेंबर निश्चित करण्यात आली होती; मात्र प्राप्त हरकतींचा मोठा प्रमाण आणि शहानिशा प्रक्रिया लक्षात घेता आयोगाने पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक मतदाराला आपले मतदान केंद्र निश्चितपणे कळण्यास मदत होणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केल्या जाणार आहेत. मूळ कार्यक्रमानुसार ही तारीख २२ डिसेंबर होती; मात्र याद्यांची अचूकता व सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आयोगाने हा बदल केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व आयुक्तांना सुधारित तारखांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून मतदारांना अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, यावर विशेष भर दिला आहे. दरम्यान, सुधारीत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्यात पोहोचली असून येत्या काही दिवसांत निवडणूक प्रक्रिया अधिक वेग घेणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी