
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.) सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाला सुरुवातीपासूनच पर्यावरणप्रेमींनी व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून ती ताबडतोब थांबविण्याची मागणी मुख्यमंत्री यांचेकडे गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांनी केली आहे मुळात साधू आणि वन हे एकमेकांचे पूरक समीकरण आहे. परंतु साधूच्या व्यवस्थेसाठीच वणांचा नाश करण्यात येत असल्याचे दृश्य अत्यंत विषम आणि वेदनादायी आहे. पर्यावरणाचा -हास करणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय ठरत नाही. कारण पर्यावरणाची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची संयुक्त आणि नैतिक जबाबदारी आहे. साधू-ग्राम प्रकल्पासाठी कोणतेही झाड तोडण्यात येऊ नये, प्रकल्पासाठी पर्यायी शासकीय जमिनींचा विचार करावा वृक्षतोड करणे म्हणजे निसर्गावर केलेला आघात असून पुढील पिढ्यांचा श्वास हिरावून घेणाऱ्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदना मार्फत करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी