
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्पामुळे परिसरात तीव्र चर्चा आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी कोंढाणा धरण व इतर जलसंधारण प्रकल्पांमुळे परिसरावर मोठा परिणाम झाल्याने आता पुन्हा मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प उभारण्यावर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चारही बाजूंनी धरणे आणि मोठे औद्योगिक प्रकल्प उभे राहिल्यास कर्जतच्या निसर्गसंपन्न सौंदर्यावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि वनजमिनीचे संपादन होणार असून याचा थेट फटका स्थानिक शेतकरी आणि आदिवासी समाजाला बसणार आहे. झाडतोड झाल्यास जंगलातील प्राणी, पक्षी आणि कीटकांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतील, जैवविविधतेला धोका निर्माण होईल. तसेच मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या पाण्यामुळे शेतसिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भूजल पातळी घसरणे, ओढे-नाले आणि तलावांचा नैसर्गिक प्रवाह बदलणे, या गंभीर बाबींचीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रकल्पामुळे धूळ, धूर, कार्बन उत्सर्जन आणि आवाज प्रदूषणात वाढ होणार आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होऊन श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि मानसिक तणाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. झाडतोडीमुळे परिसरातील तापमान वाढणे, पावसाच्या पद्धतीत बदल होणे आणि भूस्खलनाची शक्यता वाढणे हे दीर्घकालीन धोकेही समोर येत आहेत.
दरम्यान, हा प्रकल्प खासगी कंपनीमार्फत राबविण्यात येत असल्याने भविष्यात कंपनीने प्रकल्प अर्धवट सोडल्यास किंवा आर्थिक अडचणींमुळे काम बंद पडल्यास संपादित जमिनीचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा परिसर इको-सेंसिटिव्ह असल्याने अशा प्रकारचा मोठा उद्योग प्रकल्प कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
भविष्यात महावितरणचा कारभार खासगी कंपन्यांकडे दिल्यास वीजदर वाढण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. देशातील विविध भागांत अशा कंपन्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा दाखला देत कर्जतकरांनीही एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच टोरेंट पॉवर प्रकल्पाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत असल्याची माहिती अॅड. कैलास मोरे यांनी दिली आहे. नागरिकांनी हा प्रकल्प थांबविण्यासाठी संघटित व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके