एसटी कर्मचार्‍यांची ४,१९० कोटी थकीत देयके सहा महिन्यात कशी देणार? - अनिल परब
नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांचे सन २०१८ पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ तसेच वेतनवाढीच्या फरकाची अनुमाने ४ सहस्त्र १९० कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रलंबित आहे. आताच्या पुरवणी
एसटी कर्मचार्‍यांची ४,१९० कोटी थकीत देयके सहा महिन्यात कशी देणार? - अनिल परब


नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांचे सन २०१८ पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ तसेच वेतनवाढीच्या फरकाची अनुमाने ४ सहस्त्र १९० कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रलंबित आहे. आताच्या पुरवणी मागणी २ सहस्त्र ८९३ कोटी २३ लाख रुपयांना मान्यता मिळाली आहे. तरीही आपण ६ महिन्यात टप्प्या-टप्प्याने थकीत रक्कम देऊ असे कसे म्हणता? ती रक्कम आपण देऊ शकत नाही, असा प्रश्न सरकारला शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी विचारला.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांची प्रलंबित देयके अदा करण्याविषयी शिवसेनेचे सदस्य सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, दिवाळीमध्ये संपूर्ण कामगारांना दिवाळी बोनस दिला. थकबाकीतील ६५ कोटी रुपये दिले. येत्या ६ महिन्यात थकीत रक्कम देण्याचे नियोजन केले आहे. आता ७ तारखेपर्यंत कामगारांचे वेतन दिले जात आहे. सध्या २ सहस्त्र ५०० चालक आणि वाहक यांची भरती तात्पुरत्या स्वरुपात भरती करणार आहोत. २०२६ मध्ये ८ सहस्त्र बसगाड्या रस्त्यावर धावतील. सन २०४७ पर्यंत महामंडळामध्ये एकही डिझेल गाडी राहणार नाही. सर्वच्या सर्व गाड्या ‘इलेक्ट्रिक’ बसेस करण्याचे ध्येय आहे.

पी.पी.पी. तत्त्वावर बसस्थानके विकसित करणार

राज्यातील २१६ एस. टी. बसस्थानके पी.पी.पी. तत्त्वावर (सार्वजनिक खासगी भागीदारी) येत्या २ महिन्यात विकसित करणार आहोत. त्याची निविदा प्रक्रिया चालू केली आहे. त्याचे नियोजन सिद्ध केले आहे. त्यातून जे उत्पन्न मिळेल, त्यातून कामगारांचे वेतन आणि थकीत देणी देण्यात येतील. त्यासाठी बसस्थानके विकसित करण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande