
कोल्हापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।
विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच उद्योजकता वृद्धीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, लेव्हलअप अकॅडमी, कोल्हापूर आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकल टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज: एक्स्पोर्ट–इम्पोर्ट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात झाली. कार्यशाळेला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अक्षय राणे (EXIM WALA – एक्स्पोर्ट व इम्पोर्ट तज्ज्ञ) यांनी भारतीय युवकांसाठी आयात-निर्यात क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक व्यापारातील वाढत्या शक्यता, उद्योगातील आवश्यक कौशल्ये, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, परकीय बाजारपेठेतील मागणी यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच जागतिक पातळीवरील संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान घेऊन सुसज्ज व्हायला हवे, असे सांगितले.
.कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे, लेव्हलअप अकॅडमीचे संचालक सिद्धार्थ पंडित आणि संचालिका सौ. सलोनी पंडित यांनीही विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना एक्स्पोर्ट–इम्पोर्ट क्षेत्रातील नव्या दिशा, कौशल्यविकासाच्या संधी आणि जागतिक व्यापारातील करिअर मार्गांविषयी अद्यावत माहिती प्राप्त होण्यास मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar