कापूस खरेदीची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनात म.वि.स. 293 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना आमदार रणधीर सावरकर यांनी कापूस खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मु
कापूस खरेदीची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय


नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनात म.वि.स. 293 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना आमदार रणधीर सावरकर यांनी कापूस खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज विधानभवनात संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.

बैठकीत कापूस खरेदी मर्यादा वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि प्रति एकर 9.50 क्विंटल (प्रति हेक्टर 23.68 क्विंटल) या प्रमाणात कापूस खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

या संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांनीही पत्राद्वारे मागणी करून सतत पाठपुरावा केला होता. आज दुपारी झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी दिल्लीहून फोनद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार करून खरेदी मर्यादा वाढविण्याची विनंती केली होती.

गेल्या काही दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा कमी प्रमाणातच खरेदी घेतली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. 3 डिसेंबर 2025 रोजी जारी झालेल्या परिपत्रकात खरेदी मर्यादा अत्यल्प वाढविण्यात आल्याची नोंदही लोकप्रतिनिधींनी घेतली होती.

राज्यातील उच्च उत्पादकता असलेल्या तीन जिल्ह्यांची सरासरी गृहित धरून 23.68 क्विंटल प्रति हेक्टर ही उच्चतम मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांसाठी वाढीव मर्यादेने कापूस खरेदीची दारे खुली होणार आहेत.

आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचे स्वागत केले असून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande