
अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)।हिवाळी अधिवेशनात अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी सरकारला अकोल्याच्या प्रलंबित विकासकामांवरून झोडपून काढले. याआधीच्या सर्व अधिवेशनांत सातत्याने घेतलेल्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने श्री राजराजेश्वर मंदिराला ‘ब वर्ग’ दर्जा आणि ५० कोटींचा निधी मंजूर केला असला तरी, “निधी मंजूर… पण प्रत्यक्षात एक रुपयाही मिळाला नाही” असा टोकदार सवाल त्यांनी केला.
याचप्रमाणे अकोला विमानतळाच्या उन्नतीसाठी मंजूर २०९ कोटी रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारला. शहरातील उर्दू घरालाही मंजुरी मिळूनही निधी न मिळाल्याचे त्यांनी पुन्हा सभागृहाच्या निदर्शनास आणले.जनता भाजी बाजारातील ७२६ दुकानांना मनपाने बजावलेल्या नोटिसांबाबत आणि तीन वर्षांपूर्वी दानाबाजारातील दुकाने पाडून हजारो लोकांचा रोजगार हिरावून घेतल्याबद्दल त्यांनी सरकारची कोंडी केली. “लोकांचा रोजगार हिरावून घेणाऱ्या कारवाईनंतर सरकारचे धोरण काय? कायमस्वरूपी पुनर्वसन कुठे आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला.
अकोल्याच्या ७३५ कोटींच्या गटार योजनेबाबतही निधी थांबवून कामे रखडवल्याचा मुद्दा त्यांनी सरकारसमोर आणला. दानाबाजारातील दुकानदारांवर मनपाने लादलेल्या जादा करविषयीही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत तातडीने न्याय देण्याची मागणी केली.अकोल्यातील मंदिर विकास, विमानतळ, गटर योजना, व्यापाऱ्यांचे हक्क, रोजगाराचे प्रश्न— सर्व मुद्द्यांवर बुधवारी आमदार पठाण यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत अकोल्याच्या जनतेचे हक्क आवाजात मांडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे