
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक हेतूने आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या पुढाकाराने तसेच जिल्हा रक्तपेढी अलिबाग, कच्छ युवक संघ आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने येत्या १४ डिसेंबर २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कच्छी भवन, श्रीबाग – अलिबाग येथे पार पडणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, गर्भवती माता, शस्त्रक्रिया रुग्ण, थॅलेसेमिया व कॅन्सरग्रस्तांवर उपचारासाठी रक्ताची प्रचंड आवश्यकता निर्माण होते. परंतु वाढती मागणी आणि रक्तदात्यांचा अपुरा प्रतिसाद यामुळे अनेकदा रुग्णांना रक्त मिळण्यात अडचणी येतात. या तुटवड्याची पूर्तता करण्याच्या सामाजिक जाणिवेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
“Donate Blood – Save Life” या संदेशातून समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने रक्तदान करून मानवी जीवनरक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे कोणताही शारीरिक त्रास होत नाही, उलट नव्या रक्तनिर्मितीस चालना मिळून आरोग्य सुधारते, असा वैज्ञानिक संदेशही या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी कच्छ युवक संघ, लायन्स क्लब अलिबाग तसेच अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी, स्वच्छता आणि संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असून, प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे.
अलिबाग तालुक्यातील युवक-युवती, महिला व सामाजिक बांधवांनी या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आगरी समाज संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :
निलेश पाटील : ८३८०००६०६३,
केतन शहा : ९७६२४०१४००,
महेश कवळे : ९४२११७१४८०
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके