
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरातील सुमारे ४०० ते ५०० मीटर कांदळवनांची बेकायदेशीर कत्तल करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच उघड आव्हान दिल्याचा गंभीर आरोप पनवेल शहर भाजप नेत्या पल्लवी पाटील यांनी केला आहे. सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्त्याच्या नावाखाली हा पर्यावरण विध्वंस उघडपणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना देऊन तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पल्लवी पाटील यांनी म्हटले की, शहापूर औद्योगिक क्षेत्राला २००६ पासून स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून त्या काळात रिलायन्स आणि टाटा पॉवरचे प्रकल्पही लोकविरोधामुळे थांबले होते. तरीही स्थानिकांच्या आक्षेपांची पर्वा न करता एमआयडीसी सिनारमास प्रकल्प रेटत असून, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वे नंबर ५९६/अ मधील मोठ्या प्रमाणावरील कांदळवन कत्तल ही त्याचीच चालू घडामोड असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिकांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली; मात्र पोयनाड पोलीस ठाण्याने लेखी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वनविभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने प्रशासनावर जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनात नमूद केला.
कांदळवन हे सर्वोच्च न्यायालयाने संरक्षित क्षेत्र घोषित केले असून त्यांचे संरक्षण करणे ही राज्य यंत्रणेची जबाबदारी आहे. अशा स्थितीत एमआयडीसीने “आम्हीच कायदा” या भूमिकेत राहून पर्यावरणाचा विध्वंस केल्याने स्थानिक परिसंस्थेला गंभीर हानी झाल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी चार मागण्या पुढे केल्या आहेत :
— एमआयडीसी अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत
— नुकसान झालेल्या कांदळवनांचा वैज्ञानिक पंचनामा करावा
— शेतकऱ्यांची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी
— मागण्या पूर्ण होईपर्यंत कामांना स्थगिती द्यावी “शेतकऱ्यांचे हक्क आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाईलाही तयार आहोत,” असा इशाराही पाटील यांनी दिला.
दरम्यान, “शेतकरी कंदवण्याच्या कत्तलीबद्दल माझ्याकडे आले नव्हते,” असे पोयनाड पोलीस ठाण्याचे एपीआय विजय देशमुख यांनी सांगितले. “जनतेच्या तक्रारी घेणे हे आमचे कर्तव्यच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके