
जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) भुसावळ शहरातील विश्वधारा अपार्टमेंटच्या पार्किंगमधून यावल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिमन्यू विलास चहाटे (३८) यांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघा तरुणांना भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत बेड्या ठोकत चोरीचे गूढ उकलले. ५ डिसेंबरच्या सकाळी चहाटे यांची (एमएच-२७ बीए-५४१७) दुचाकी अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली व तपासाला सुरुवात झाली.पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरातील महत्त्वाच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गांधी पुतळा परिसरातील एका कॅमेऱ्यात एक युवक चोरलेल्या दुचाकीसह जात असल्याचा स्पष्ट ठसा मिळाला. या धाग्यावर पुढे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तीनही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत तिघांनी दुचाकी चोरीची कबुली देत मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात दिली. वैभव (ओम) योगेश जंजाळकर (१८), अमितेश सचिन बऱ्हाटे (१८) आणि आझादश्री केदारनाथ सानप (१८).अशी या संशयितांची नावे आहेत. या कारवाईत पो.हे.कॉ. संदीप पालवे, रज्जाक खान, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे, विकार शेख, रॉकी पाटील आणि दीपक पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर