एसटीच्या शालेय सहलींना उदंड प्रतिसाद; तब्बल २२४३ बसेस आरक्षित
मुंबई, 11 डिसेंबर (हिं.स.)। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल 2243 बसेस राज्याच्या व
एसटीच्या शालेय सहलींना उदंड प्रतिसाद; तब्बल २२४३ बसेस आरक्षित


मुंबई, 11 डिसेंबर (हिं.स.)। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल 2243 बसेस राज्याच्या विविध आगारातून शालेय सहलींसाठी देण्यात आल्या. यातून महामंडळाला 10 कोटी 85 लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे.

दिवाळी संपली की शाळेच्या मुलांना वेध लागतात ते शालेय सहलीचे ! शालेय सहल हा विद्यार्थी जीवनातील एक हळवा कोपरा असतो. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला एसटी महामंडळ बसेस उपलब्ध करून देते. शासनाने एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला 50% सवलत दिली आहे . त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहलीचा अनुभव घेता येतो. यंदा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. नव्या कोऱ्या एसटी तुन राज्यभरातील हजारो विद्यार्थी गड - किल्ले, नयनरम्य समुद्र किनारे, धार्मिक स्थळे यांच्या सहलीला जाऊ लागली. एका नोव्हेंबर महिन्यात तब्बल 2243 एसटी बसेस मधून सुमारे 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहलीचा आनंद घेतला आहे.

यंदा राज्यातील विविध विभागांमध्ये एसटीच्या शालेय सहलींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२५ मध्ये बससंख्या आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे.

एसटीच्या 31 विभागांपैकी कोल्हापूर विभागाने 375 एसटी बसेस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत 1 कोटी 77 लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. त्यानंतर सांगली (211 बसेस) व रत्नागिरी ( 201 बसेस) यांनी चांगली कामगिरी केली आहे.

डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असून स्वस्त, सुरक्षित आणि आनंददायी सहलीसाठी सर्व शाळांनी एसटीच्या बसेस आरक्षित कराव्यात असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande