
जळगाव , 11 डिसेंबर (हिं.स.) उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम जळगाव शहरासह जिल्ह्यात होत आहे. याचा परिणाम म्हणून सलग तिसऱ्या दिवशीही पारा घसरला आणि तापमानात ८ अंशाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन दिवसात किमान तापमान दीड अशांनी घसरले आहे. यामुळे जळगावकर थंडीने गारठले असून जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीची लाट दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात बुधवारी परभणी येथे नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस, तर धुळे आणि जेऊर येथे प्रत्येकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड मध्ये ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जळगाव येथे ८ अंशांपेक्षा कमी, तर नाशिक, पुणे, यवतमाळ, नागपूर, गोंदिया येथे ९ अंशांपेक्षा कमी आणि मालेगाव, वर्धा येथे १० अंशांपेक्षा तापमान नोंदले गेल्याने हुडहुडी कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. दरम्यान पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर