अभिनव ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘क्रांतिज्योती विद्यालय’चे गाणे प्रसिद्ध
रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आज उत्साहाच्या वातावरणात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटातील ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गीताचे भव्य अनावरण करण्यात आले. हजा
अभिनव ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘क्रांतिज्योती विद्यालय’चे गाणे प्रसिद्ध


रायगड, 11 डिसेंबर (हिं.स.)। कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आज उत्साहाच्या वातावरणात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटातील ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गीताचे भव्य अनावरण करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व या कार्यक्रमात शाळा परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाळेचेच माजी विद्यार्थी हेमंत ढोमे यांच्या हस्ते गीताचे लोकार्पण झाले. मंचावर उपस्थित विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत करताच ढोमे भावूक झाले. “माझे पहिले नाटक याच शाळेत झाले. आज चित्रपटातील गाण्याचे अनावरण या ठिकाणी करण्याचा आनंद शब्दात मावणारा नाही,” असे त्यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गीत शालेय जीवनातील निरागस मैत्री, आठवणी, हसू–खेळ यांचे सुरेल चित्र उभे करणारे आहे. गीतकार स्व. रत्नाकर मतकरी यांच्या प्रभावी शब्दांना संगीतकार हर्ष–विजय यांनी दिलेले आधुनिक संगीत आज उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात अनुभवले. गाण्याचे व्हिडिओ प्रदर्शन सुरू होताच मैदानात एकच जल्लोष उसळला.

कार्यक्रमात कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, फोटोसेशन झाले आणि शाळेच्या परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले. पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सिने–सोहळ्याचे स्वागत केले.

शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले की, “अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नव्या कल्पनांचा आणि कलाक्षेत्रातील संधींचा परिचय होतो. हे गाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात नवे स्वप्न फुलवणारे ठरेल.” ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. अनावरणामुळे कर्जतच्या सांस्कृतिक वातावरणात नवचैतन्य फुलले असून या गाण्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande