
नागपूर, ११ डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्यासुरक्षितरणासाठी सरकारने यावर्षी १९ लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. हा दावा विधानसभेत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केला.
विधानसभेत विरोधी आमदार संतोष दानवे यांनी शेतमाल आणि कापसाला हमीभाव देण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. पणन मंत्री रावल यांनी सांगितले की, मागील वर्षी ११.२५ लाख टन सोयाबीन खरेदी झाली होती, तर या वर्षी राज्यात अंदाजे ८० लाख मे. टन सोयाबीन उत्पादन अपेक्षित आहे. बाजारभाव खाली जाऊ नये यासाठी हस्तक्षेप योजना राबवली जाते. बारदाना खरेदीसाठी आधीच १२० कोटींचे ऍडव्हान्स पेमेंट केले आहे.
सदर खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जात आहे. सीसीआयने मागील हंगामात १०,७१४ कोटींची कापूस खरेदी केली होती, तर सोयाबीन सध्या ५,३२८ रुपये प्रति क्विंटलच्या दराने खरेदी होत आहे.विरोधी आमदार विजय वडेट्टीवार यांनी या उत्तरावर आक्षेप घेतला, ते म्हणाले की, सीसीआय केवळ लांब धाग्याचा कापूस खरेदी करते आणि मागील हंगामातील खरेदी दर २१ क्विंटल होते, तर आता १५ क्विंटलमध्ये खरेदी केली जात आहे. तसेच परदेशातून कापूस आयात केला जात आहे, ज्यावर पूर्वी १२ टक्के आयात शुल्क लागू होते, ते आता शून्य टक्के केले गेले आहे.विरोधी आमदारांनी सरकारकडे आयातीवरील कर, कापसाची खरेदी क्षमता आणि सोयाबीन हमीभाव यासंदर्भातील स्पष्ट योजना विचारली. उपप्रश्न बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके आणि नाना पटोले यांनी देखील उपस्थित केले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर