
ठाणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नूतनीकरण केलेल्या ९०० बेडच्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल) काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रुग्णालयात पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वसामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी 'हब-एंड-स्पोक' धोरण लागू करण्याची मागणी आज संसदेत `शून्य प्रहर' काळात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून सार्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. ३०० खाटांचे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने आणि काही इमारती मोडकळीस आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वास्तूचे नूतनीकरण करण्याचे ठरवून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे.
ठाणे हे भारतातील सर्वात वेगाने शहरीकरण होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये सहा मोठ्या महानगरपालिका आहेत. येथील लोकसंख्येची संख्या आणि ओपीडीचा भार इतका जास्त आहे की, केवळ रुग्णालय बांधणे पुरेसे ठरणार नाही. आजही लाखो रुग्ण गंभीर आरोग्य सेवेसाठी मुंबईत येतात. म्हणूनच याठिकाणी उपचारांसोबतच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता आहे. ही सुपर-स्पेशालिटी पायाभूत सुविधा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये यासाठी सरकारने पीपीपी मॉडेल वापरून ते तात्काळ पूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करावे. यामुळे स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांची निर्मिती तर होईलच, शिवाय मुंबईतील रुग्णालयांवरील वाढता ताणही कमी होईल अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
पुढील तीन वर्षांत जिल्हा रुग्णालयांमध्ये ४,५०० कॅन्सर डे-केअर बेड आणि २०० नवीन केंद्रे उघडली जातील अशी घोषणा अर्थसंकल्पात केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत केले. गरिबांसाठी ही एक जीवनरेखा ठरणार आहे असे ते म्हणाले. कॅन्सरचे उपचार तज्ञ डॉक्टरांकडून केले जातात. आज जिल्हा पातळीवर कॅन्सर तज्ञांची मोठी कमतरता आहे. जर आपण फक्त मशीन बसवल्या आणि डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत तर ही संसाधने वाया जातील. म्हणून सरकारने कर्करोगरुग्णाच्या काळजीसाठी हब-अँड-स्पोक मॉडेल अनिवार्य करावे. याचा अर्थ या नवीन जिल्हा केंद्रांना टाटा मेमोरियल सारख्या मोठ्या कर्करोग संस्थांशी (हब) स्पोक म्हणून जोडणे आवश्यक आहे. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पीपीपी व्यवस्थेद्वारे त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील देशातील सर्वोत्तम तज्ञांकडून सल्लामसलत मिळून चांगले उपचार मिळतील, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर