
नवी मुंबई, 11 डिसेंबर (हिं.स.)। “नवोपक्रम, तंत्रज्ञान, उद्योगक्षेत्र आणि समुदाय यांच्या समन्वयातूनच ग्रामीण परिवर्तनाला गती देता येते,” असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.
आयआयटी बॉम्बे येथे नुकतेच स्वदेस फाउंडेशन, आयआयटी बॉम्बेच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रुरल एरियाज (CTARA) आणि ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी (GESH) संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विविध क्षेत्रांच्या भागीदारीद्वारे ग्रामीण परिवर्तन’ या विषयावर उच्च-प्रभावी संवाद सत्र पार पडले. महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून ‘विकसित महाराष्ट्र’ या शासनाच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटले.
कार्यक्रमात ‘क्रॉस-सेक्टर भागीदारीद्वारे ग्रामीण विकासाला गती’ या विषयावर पॅनेल चर्चा घेण्यात आली. चर्चेत डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह प्रा. बकुल राव (CTARA), श्री. रोनीट सेन (HSBC इंडिया), डॉ. प्रत्युष पांडा (CEO, वन स्टेज) आणि श्री. मंगेश वांगे (CEO, स्वदेस फाउंडेशन) यांनी सहभाग घेतला.
CTARA व GESH येथील प्राध्यापकांनी ग्रामीण भागातील हरित ऊर्जा, नवकल्पना आणि ग्रामीण प्रणालींमध्ये होत असलेल्या तांत्रिक प्रगतीविषयी माहिती सादर केली. त्यानंतर स्वदेस फाउंडेशनतर्फे समुदाय-आधारित परिवर्तनाच्या प्रेरणादायी उदाहरणांचे सादरीकरण करण्यात आले.
या सत्रात डॉ. माणिक दिवे (अतिरिक्त आयुक्त, कोकण विभाग), विविध CSR भागीदार संस्था, स्वदेस फाउंडेशनची टीम, आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, धोरणनिर्माते आणि तळागाळातील संस्थांमध्ये फलदायी संवाद घडला.
या संवादातून शासन, उद्योगक्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि समुदाय यांच्यातील सामूहिक कृतीची ताकद अधोरेखित झाली. विस्तारक्षम तंत्रज्ञान, डेटा-आधारित धोरणनिर्मिती, गरजांवर आधारित गुंतवणूक आणि प्रभावी अंमलबजावणी यांच्या साहाय्याने ग्रामीण महाराष्ट्राचा शाश्वत विकास वेगाने साध्य होऊ शकतो, असा संदेश या उपक्रमातून दृढ झाला.
2047 आणि त्यापुढील ‘विकसित महाराष्ट्र’चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अशा बहुपक्षीय भागीदारी अनिवार्य असल्याचे मत या कार्यक्रमात नोंदविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर