
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। अपघातग्रस्त मोपेड गाडी दुरुस्त करतो, असे सांगत शोरूमच्या मॅनेजरसह इन्शुरन्स प्रतिनिधीने त्या गाडीची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना महात्मानगरच्या ओला शोरूममध्ये घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सागर मोहन काळे (वय ४०, रा. ढिकलेनगर, पंचवटी) यांच्या एमएच १५ जेजी १७२५ या क्रमांकाच्या मोपेड गाडीचा अपघात झाला होता. ही गाडी दुरुस्त करून घेतो, असे सांगत ओला शोरूमचे मॅनेजर नोमान शेख व इन्शुरन्स प्रतिनिधी संकेत तासकर यांनी काळे यांचा विश्वास संपादन केला. शोरूममध्ये मॅनेजरने हे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून काळे यांनी दुरुस्तीसाठी गाडी ओला शोरूमच्या पार्किंगमध्ये लावली. दोघा आरोपींनी गाडी दुरुस्त करून देण्याऐवजी तिची परस्पर विल्हेवाट लावल्याचे काळे यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळे यांनी दोघा आरोपींविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV