
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)विदर्भातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. माकडांच्या उत्पादामुळे सोलरच्या प्लेट फुटणे आणि सोलर यंत्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय, सोलरवर मोटार पंप पाहिजे त्याप्रमाणे चालत नसल्याने पिकांचे ओलीत होत नाही. थोडेजरी ढगाळ वातावरण असले तरीही सोलर बंद पडते. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर सक्तीचा घेतलेला धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर सक्तीचे धोरण बदलून मागेल त्याला सोलर आणि मागील त्याला ऐजीचे विद्युत कनेक्शन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या मागणीसाठी माजी अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शनिवारी हिवाळी अधिवेशनात तिवसा तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सरपंच्यांनी निवेदन दिले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, शिवनगाव ग्रामपंचायत सरपंच धर्मराज खडसे, अनकवाडीचे सरपंच सूरज धुमनखेडे आणि धोत्रा येथील सरपंच भूषण गाठे यांची उपस्थिती होती. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ज्या जिल्ह्याने राज्याला ऊर्जा दिली. थर्मल पॉवर स्टेशन दिले त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐजी पंपाचे कनेक्शन द्यायला तयार नाही. माझा चंद्रपूर सर्कल सुद्धा ऐजी पंपाच्या कनेक्शन पासून वंचित आहे. त्यामुळे सोलरची सक्ती ही चुकीचीच आहे. ऐजी पंपाचे कनेक्शन द्यायलाच पाहिजे असे म्हणत. दिलेल्या निवेदनाद्वारे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून यासंदर्भातील धोरण बदलण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी