
गडचिरोली., 15 डिसेंबर (हिं.स.)अतिदुर्गमतेवर मात करून आरोग्य विभागाने मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम आणि विखुरलेली व डोंगराळ जंगलव्याप्त गावे असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतो.
नुकतेच आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणी नोव्हेंबर २०२५ चे रँकिंग संचालक आरोग्य सेवा, आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने ८७ गुणांसह राज्यात तिसरा क्रमांक पटकावून आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा आरोग्य विभाग मागील सहा महिन्यांपासून सातत्याने राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.
६४ आरोग्य निर्देशाकांमध्ये प्रभावी काम: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व आरोग्य विषयक कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येतात. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर माता नोंदणी, माता व बाल संगोपन, बालकांचे लसीकरण, राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम, साथरोग, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, हिवताप निर्मूलन कार्यक्रम, सुरक्षित व संस्थेत प्रसूती अशा विविध ६४ आरोग्य निर्देशाकामध्ये केलेल्या कामाच्या आधारावर आयुक्त कार्यालयाकडून हे गुणांकन (रँकिंग) केले गेले आहे.
दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जिल्ह्याला हे यश प्राप्त झाले आहे, असे डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी) यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील विविध आरोग्य कार्यक्रम समन्वयक, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षकीय अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका यांच्या सामूहिक आणि अथक प्रयत्नाने हे यश शक्य झाले आहे. यानंतर सुद्धा राज्यात कायम अव्वल राहण्याकरिता आरोग्य विभाग प्रयत्नशील असणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond