
- ५ अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)।
वीजबिल वसूलीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महावितरणने अमरावती परिमंडळात कडक कारवाई केली आहे. नोव्हेंबर महिन्याची वीजबिल डिमांड वसूल करण्यात अपयशी ठरलेल्या ५ अधिकाऱ्यांच्या पगारातून एक तृतियांश रक्कम कपात करण्यात आली असून, २६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वीजबिल वसूलीसंदर्भात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिला आहे.
महावितरणचे अस्तित्व शंभर टक्के वीजबिल वसूलीवर अवलंबून आहे. अपेक्षित वसूली न झाल्याने ऑक्टोबर २०२५ अखेर अमरावती परिमंडळातील विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे एकूण ९०६ कोटी रुपयांची थकबाकी होती. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३६९ कोटी ७९ लाख आणि यवतमाळ जिल्ह्यातील ५३६ कोटी ५२ लाख रुपयांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात अमरावतीत ८९ कोटी ७६ लाख तर यवतमाळ जिल्ह्यात ५५ कोटी ६९ लाख रुपयांची वसूली झाली असली, तरी अद्याप सुमारे ७५५ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
थकबाकी वाढत असल्याने महावितरणने वसूलीसाठी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश देण्यात आले असून, वसूलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर महिन्याची डिमांड वसूल न झाल्याने अमरावती जिल्ह्यातील ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील २७ अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी