
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)आगामी पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका होईपर्यंत मनपाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात येताच अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या मर्जीच्या प्रभागातील क्षेत्रीय कार्यालयात बदली मिळावी, यासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणुका संपेपर्यंत विविध कारणे दाखवून किंवा विनंतीच्या स्वरूपात येणारे बदली प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.महापालिका निवडणुकांशी संबंधित मतदार यादी अंतिम करणे तसेच त्यानुसार निवडणूकप्रक्रिया राबवणे, ही सध्या अत्यंत महत्त्वाची आणि प्राधान्याची कामे सुरू आहेत. यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक कामांवर नेमण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु