
पुणे, 15 डिसेंबर (हिं.स.)शहरी भागांतील वाढत्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याच्या दिशेने पुण्यातील राष्ट्रीय जल अकादमी (एनडब्ल्यूए) येथे दोन दिवसीय शहरी पूर व्यवस्थापनावरील प्रशिक्षण मॉड्यूलच्या सह-विकासासाठी लेखन कार्यशाळेचे आयोजन केले होते. भारत–युरोपियन युनियन जल उपक्रम (आयइडब्लूआय) तिसरा टप्पा अंतर्गत जर्मन विकास सहकार्य संस्था (जीआयझेड) आणि डेन्मार्कच्या डॅनिश हायड्रॉलिक इन्स्टिट्यूट(डीएचआय) यांच्याशी सहयोगातून राबविलेल्या उपक्रमामुळे देशातील शहरी पूर व्यवस्थापन क्षमतेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारत- युरोपियन युनियन जल उपक्रम २०१६ पासून जलसंपदा व्यवस्थापन, नदी संवर्धन, पूर–दुष्काळ व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि प्रगत जलतंत्रज्ञान या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या टप्प्यात (२०२४–२७) शहरी पूर व्यवस्थापन, जलसंपदा डेटा व्यवस्थापन(डब्लूआरडीएम) आदी क्षेत्रातील विशेष तांत्रिक प्रशिक्षण विकसित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय जल अकादमीला देण्यात आली आहे.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता व प्रमुख डी. एस. चासकर होते. अकादमीचे आणि केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी, डेन्मार्क येथील डॅनिश हायड्रॉलिक इन्स्टिट्यूट(डीएचआय) तज्ज्ञ, भारत-युरोपियन युनियन जल उपक्रम–जर्मन विकास सहकार्य संस्थेचे प्रतिनिधी तसेच भारत हवामान विभाग, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई) बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था आणि इतर संस्थांतील विशेष तज्ज्ञांनी या लेखन कार्यशाळेत सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु