सोलापूरला दररोज पाणीपुरवठा , १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)राज्य सरकारने सोलापुरात पाणीपुरवठा दररोज व्हावा, यासाठी ८९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊन सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. हद्दवाढ भागात तब्बल ६५० किलोमीटर तर अन्य ठिकाणी ६५ किलोमीट
सोलापूरला दररोज पाणीपुरवठा , १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ


सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)राज्य सरकारने सोलापुरात पाणीपुरवठा दररोज व्हावा, यासाठी ८९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊन सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. हद्दवाढ भागात तब्बल ६५० किलोमीटर तर अन्य ठिकाणी ६५ किलोमीटर पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार जागतिक बॅंकेकडील ६०० कोटी महापालिकेला मोफत देणार असून महापालिका २०० कोटी रुपये रोख्यातून उभारणार आहे.सोलापूर शहरात २५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००० साली पहिल्यांदा एक दिवसाआड पाणीपुरवठा झाला. त्यानंतर विविध अडचणींमुळे पाण्याचे दिवस वाढले आणि आता चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पण, आता गरजेच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या व अंतर्गत पाइपलाइन टाकली जाणार असल्याने शहराला दररोज पाणी मिळणार आहे.यासंदर्भात उद्या (सोमवारी) बैठक होणार असून २२ डिसेंबरला आणखी एका बैठकीचे नियोजन केले आहे. त्यानंतर निविदा प्रसिद्ध होईल. एक महिन्यानंतर निविदा उघडून कामाला सुरवात होईल, असे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम डिझाईन, बिल्ड आणि ऑपरेशन (डीबीओ) अशा पद्धतीचे असणार आहे. त्यानुसार ठेकेदार कामाचा आराखडा सादर करेल, त्यानंतर प्रत्यक्षात काम करून किमान दहा वर्षे या कामाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande