
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील २५ ते ३० कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी थेट भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या उमेदवार मुलाखतींमध्ये या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
आमदार रवी राणा यांच्या पक्षातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारीसाठी पुढे आल्यामुळे युवा स्वाभिमान पक्षातील अंतर्गत स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वतः च्या पक्षातून उमेदवारी मिळण्याबाबत कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे का? असा सवाल आता राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षाकडून संधी अधिक असल्याचे कारण देत काहीकार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश कार्यक्रमात युवा स्वाभिमानशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लगेचच उमेदवारीची मागणी केल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या घडामोडींमुळे भाजपच्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यास स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे आमदार रवी राणा हे महायुतीमध्ये भाजपसोबत जाण्याचे संकेत देत असताना दुसरीकडे न्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते थेट भाजपच्या जागांवर दावा ठोकत असल्याने दुहेरी राजकीय भूमिका समोर येत असल्याची चर्चा आहे. ही परिस्थिती युवा स्वाभिमान पक्षासाठी अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी ठरत असून आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.आगामी काळात भाजप नेतृत्व या उमेदवारी दाव्यांबाबत काय निर्णय घेते आणि युवा स्वाभिमान पक्ष यावर कशी भूमिका मांडतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी