
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)।
शहराचे नवीन पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नुकताच अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. आगामी निवडणूकीला प्राथमिकता देण्यात येणार असून भयमुक्त वातावरणात निवडणूक होणार आहे. पोलिसांचे ब्रीदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय आहे याच प्रमाणे शहरात पोलिसिंग होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पोलीस आयुक्त राकेश ओला पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले. मावळते पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही डीसीपी, एसीपीसह पोलीस अधिकारी उपस्थीत होते. त्यानंतर त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर मांध्यमांशी संवाद साधला.राकेश ओला हे मुळ राजस्थान येथील रहिवाशी असून पोलीस दलात येण्याआधी राजस्थान येथे सहा वर्ष ते न्यायाधीश होते. २०१२ च्या बॅचचे ते आयपीएस आहेत.आयपीएस झाल्यानंतर त्यांनी प्रथम अहिल्यानगर, मालेगाव, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण येथे सहायक पोलीस अधिक्षक व पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते मुंबईला उपायुक्त म्हणून कार्यरत होते. विदर्भात कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच मनपा निवडणूक जाहिर झाल्यामुळे प्रथम प्राथमिकता त्यांनी येणाऱ्या निवडणुकीला दिली आहे. भयमुक्त वातावरणात मनपा निवडणूक होणार असून कोणाचीही हयगय केली जाणार नाही. पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम होणार आहे. शहरातील गुन्हेगारांची माहिती घेतल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर नियमित कारवाई होणार असून गुन्हेगारांना पोलिसिंग काय असते, याबाबत लवकरच माहिती पडेल. शहरात वाहतूकीचा मोठा प्रश्न असून याबाबत आढावा घेऊन लवकरच काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच शहरातील सर्व अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी