
रायगड, 17 डिसेंबर, (हिं.स.) - आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून “कंबर कसली” असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पनवेल येथे पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनिती, संघटनात्मक मजबुती आणि संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. सुनील तटकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. याबाबत कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना देत, युतीच्या माध्यमातून विकासाभिमुख आणि स्थिर प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक तसेच जिल्हा समन्वयक शिवदास कांबळे व अन्य पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात युतीच्या जागावाटपाबाबत व प्रचाराच्या आराखड्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदिती तटकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विशेषतः महिला व युवकांना उमेदवारी तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यावर भर देण्यात येणार आहे.
पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने या बैठकीत व्यक्त केला. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके