
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी स्थळाची सखोल पाहणी केली.या पाहणीदरम्यान आयुक्तांनी मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष तपासणी केली. मतमोजणी टेबलांची मांडणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी असलेली बसण्याची व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव कक्ष, तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मूलभूत सुविधांची त्यांनी माहिती घेतली. मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व तयारी काटेकोरपणे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.मतमोजणी केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देत आयुक्तांनी सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश व निर्गमन मार्ग, पोलीस बंदोबस्त तसेच ओळखपत्र तपासणी यंत्रणा यांचा आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रियेची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राहील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. याशिवाय अखंड वीजपुरवठा, जनरेटरची उपलब्धता, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना यांचीही त्यांनी तपासणी केली.यावेळी आयुक्तांनी स्ट्रॉंगरूम, ऑब्झर्व्हर रूम, पार्किंग व्यवस्था, पोलीस नियंत्रण कक्ष तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेची पाहणी केली. सर्व बाबींमध्ये योग्य व शिस्तबद्ध नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतमोजणीच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय राहावा, तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पूर्वनियोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नमूद केले. सर्व संबंधित विभागांनी आपापली जबाबदारी वेळेत आणि दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, निवडणूक विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने व नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी