
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजापेठ येथील शिवसेना भवनात शिवसैनिकांसह इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली.महानगरातील विविध प्रभागातून शिवसैनिक, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने शिवसेना भवनात दाखल झाले होते. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ मुरू असून पहिल्याच दिवशी संपूर्ण महानगरातून तब्बल १६७ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज उचलले असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागात ताकदीचे उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असून स्थानिक कार्यकत्यांनाप्राधान्य देण्याची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पक्ष संघटन, प्रभागातील कार्यक्षमता व जनसंपर्क या निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.उमेदवारी अर्ज उचलताना शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. पुढील काही दिवसांत उमेदवार निश्चिती प्रक्रियेला वेग येणार असून पक्षातील राजकीय हालचालींना अधिकच उधाण येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी