
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)।
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. २१ जानेवारी रोजी मुंबईत 'पिवळं वादळ' धडकणार असल्याची ठाम घोषणा धनगर आरक्षण संघर्षांचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी केली. 'एकानं काही होत नाही, एकीनं लढावं लागतं, असे त्यांनी देऊळगाव मही येथे आयोजित कार्यक्रमात सांगून संपूर्ण समाजाला निर्णायक संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन बोऱ्हाडे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शब्द दिला आहे, असे स्पष्ट करत बोऱ्हाडे म्हणाले की, तो शब्द पूर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी दीपक बोऱ्हाडे म्हणाले की,'हा लढा माझा वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. चार आयोगांचे अडथळे, न्यायालयीन संघर्ष आणि अनेक अडचणी असूनही हा लढा थांबलेला नाही. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या या लढ्याला कुठलीही ताकत थांबवू शकत नाही.' माझी गाडी फोडली, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. आंदोलन दडपण्याचे अनेक डाव रचले गेले. पण आम्ही कसल्याही षडयंत्राला बळी पडणार नाही आणि धमक्यांना भीक घालणार नसल्याचे हि ते यावेळी म्हणालेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी