
मुंबई / अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)।
आमदार प्रताप अडसड हे मतदारसंघाच्या कामानिमित्त मुंबई मंत्रालय गेले असता त्यांनी मुंबईत मेट्रोने प्रवास केला. मुंबईसारख्या प्रचंड गजबजलेल्या महानगरात वेळ, सोय आणि सुरक्षितता यांचा विचार केला तर मेट्रोसारखी आधुनिक वाहतूक व्यवस्था किती महत्त्वाची आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचा आवर्जुन उल्लेख केला.
मुंबई मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कल्पनेतून प्रत्यक्षात आणणे हे सोपे काम नव्हते. अनेक अडथळे, तांत्रिक अडचणी, प्रशासकीय गुंतागुंत आणि राजकीय टीका यांचा सामना करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांना गती दिली. दूरदृष्टी, ठाम निर्णय क्षमता आणि विकासाबाबतची स्पष्ट भूमिका यामुळेच आज सामान्य मुंबईकर मेट्रो सारख्या सुविधेचा लाभ घेत आहेत.मुंबईत मेट्रोतून केलेला सोयीस्कर, वेळ वाचवणारा आणि आरामदायी प्रवास म्हणजे विकासाचे जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळत, पर्यावरणपूरक आणि आधुनिक साधनातून प्रवास करताना जाणवते की योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय किती दूरगामी परिणाम घडवू शकतात. हे फक्त एक वाहतूक साधन नाही, तर मुंबईला भविष्याकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे, हे सांगण्यात प्रताप अडसड विसरले नाहीत.मतदारसंघासाठी काम करताना अशा प्रकल्पांकडून निश्चितच प्रेरणा मिळते. लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारे, त्यांचा वेळ वाचवणारे आणि जीवनमान उंचावणारे प्रकल्प म्हणजेच खऱ्या अर्थाने विकास. मेट्रोच्या प्रवासात ही जाणीव अधिक ठळकपणे झाली की दूरदृष्टी असलेले नेतृत्व असेल, तर मोठी स्वप्ने साकार होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेला हा विकासाचा मार्गच भविष्यातही आपल्याला पुढे नेईल, याबद्दल मनात नक्कीच अभिमान आणि विश्वास वाटतो, असे यांनी मेट्रो प्रवासाचे वर्णन करताना म्हटले. या प्रवासादरम्यान चेतन कायरकर तसेच आशिष मेरखेडकर हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी